• INTERNATIONAL LONGEVITY CENTRE-INDIA

ज्येष्ठांसाठी ‘साद संगत’ मार्गदर्शक

“विश्वास असेल तरच साद घातली जाते आणि त्याला संगती ची योग्य जोड मिळाली कि  सेवा  घडते” असे उदगार वृद्ध कल्याण शास्त्राच्या अभ्यासक डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी ‘साद-संगत’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले. “वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांची काळजी घेणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालले आहे. या पुस्तकात वृद्ध व रुग्णांची काळजी योग्य प्रकारे कशी घ्यायची याचा तपशील आहेच, त्याचबरोबर जे काळजी घेतात (caregiver) त्यांनी स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे याचेही मार्गदर्शन आहे, जे मोलाचे आहे” असे रोहिणीताई पुढे म्हणाल्या.

 
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ‘महिला व बालकल्याण समिती’ अध्यक्ष असताना, त्यांच्या संकल्पनेतून निर्मिलेल्या ‘bedside caregivers handbook’ चे  प्रकाशन पुण्याचे माजी पोलीस आयुक्त व आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्राचे कार्याध्यक्ष श्री.जयंत उमराणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. “एकत्र कुटुंब व्यवस्था ढासळत चालल्याने वृद्धांची सेवा-सुश्रुषा करण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कुटुंबात ज्येष्ठांना होणारा त्रास हा ‘सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही’ या सदरात मोडतो. त्यामुळे त्याला silent crying असे संबोधतात. कायद्याने यात काही मदत होत नाही. वृद्धकल्याणासाठी प्रबोधन झाले पाहिजे आणि त्याला सामाजिक चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, तरच उपयोग होईल” असे त्यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेने हे पुस्तक प्रकाशित करून एक पाऊल पुढे टाकले आहे. आता त्यांनी महिला व बालकल्याण समिती बरोबरच ‘वृद्धकल्याण समितीची’ही स्थापना करावी असे आग्रही प्रतिपादन उमराणीकर यांनी यावेळी केले.

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” माझ्या प्रभागातील दोन समस्यांची सांगड घालून त्यावर उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. घरोघरच्या एकेकट्या आजी-आजोबांना प्रशिक्षित व्यक्तीची सोबत मिळेल व गरजू स्त्री-पुरुषांना रोजगार उपलब्ध होईल हा यामागील हेतू आहे. म्हणून, ‘कर्नल्स क्युब’ संस्थेच्या सहकार्याने ‘bedside caregivers’चे  प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यासाठी जागाही उपलब्ध करून दिली व आता प्रशिक्षणार्थींसाठी पुस्तकही प्रकाशित केले आहे. समाजात एकमेकांची काळजी घेणाऱ्या वृद्ध पतिपत्नींनाही हे पुस्तक उपयोगी पडेल.”

” कोरोना काळात प्रत्यक्ष भेटी अथवा मेळावे घेता येत नसल्याने पुस्तक प्रकाशनाचा विचार माझ्या मनात आला. विविध विषयांवरची चार पुस्तके मी प्रकाशित केली. त्याच मालिकेतील हे पुस्तक आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

या पुस्तकाचे लेखक कर्नल कुमार फुले व पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

श्रीमती कमलिनी कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या समारंभात दहाव्या तुकडीतील चार प्रातिनिधिक caregivers चा सत्कार करण्यात आला.

यावेळी कर्नल्स क्युब संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0